माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेला सुरुवात झाली. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री - महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या ह्या परिषदेच्या सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बॅसिडर) याप्रसंगी उपस्थित होत्या. शाश्वत विकास, शाश्वत शेती आणि पोषण धान्य यांचा जागर यानिमित्ताने होणार आहे.
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेमुळे पोषणधान्य जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा कशी अधोरेखित झाली हे नमूद केले. आपल्या उद्घाटनपर संदेशात रामनारायण रुईया महाविद्यालय करत असलेल्या संशोधन विषयक प्रकल्पांचे त्यांनी कौतुक केले. २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले जावे, ही भारताची सूचना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने मान्य केली आणि २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष’ म्हणून घोषित झालेले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या भरडधान्यांना अर्थात ‘पोषणधान्यांना’ पुन्हा एकदा पाठबळ मिळावे, चालना मिळावी हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
याप्रसंगी ‘मिलेट मॅन’ म्हणून परिचित असणारे डॉ. खादर वल्ली, हेही उपस्थित होते. या दोन दिवसीय संशोधन परिषदेत जे शोधनिबंध सादर केले जाणार आहेत त्याविषयी माहिती देणारी पुस्तिका आणि भरडधान्यांपासून बनवता येणाऱ्या पाककृतीचे पुस्तक (रेसिपी बुक) यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
प्राचार्या डॉ. अनुश्री लोकूर यांनी रुईया महाविद्यालय ८५ व्या वर्षात पदार्पण करत असताना एक शाश्वत विकासासाठी कटिबद्धता राखत, सामाजिक भान आणि जबाबदारी म्हणून ही परिषद आयोजित करत आहे असे म्हणून परिषदेमागील भूमिका स्पष्ट केली. यानंतर परिषदेच्या मुख्य समन्वयक डॉ कामिनी दोंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
शि.प्र.मंडळींचे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री एस. के. जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जनतेने आपल्या आहारात भरडधान्य कशी अधिकाधिक असतील यावर भर द्यावा असे म्हटले. पद्म पुरस्कार मोठे आहेतच पण, काही जणांना पदमश्री सारखे पुरस्कार मिळाले की पुरस्कार मोठे होतात हेच डॉ. खादर वल्ली यांच्यावरून सिद्ध होते असे त्यांनी म्हटले. शि.प्र.मंडळींचे उपाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण चितळे यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त करताना अशी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात मोलाची भूमिका पार पडणाऱ्या सगळ्यांचे कौतुक केले.
रुईया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असलेल्या सेलिब्रेटी आहार तज्ञ ऋजुता दिवेकर या सुद्धा याप्रसंगी उपस्थित होत्या. पोषणधान्य आहार, संस्कृती आणि जीवनशैली या तिघांचा भाग झाला पाहिजेत असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
मिलेटमॅन डॉ. खादर वल्ली यांनी हरितक्रांतीनंतर भारतीयांच्या आहारात कसे बदल घडून आले आणि हळूहळू पोषण धान्याचे महत्त्व कसे कमी होऊ लागले याविषयी भाष्य करून नव्याने हरितक्रांतीची गरज बोलून दाखवली. मात्र या हरितक्रांतीमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी भरडधान्य केंद्रस्थानी असायला हवी यावर त्यांनी भर दिला. शंभराहून अधिक आजार फक्त चुकीचे अन्नधान्य आहारात असल्यामुळे होतात व यावर खात्रीशीर उपाय म्हणजे आहारामध्ये भरड धान्यांचा वापर करणे हाच आहे असे मत त्यांनी नोंदवले. कृषी संबंधित संशोधन संस्थांनी शेतकऱ्यांचे भले व्हावे आणि सर्वसामान्य माणसाचे पोषण व्हावे यासाठी भविष्यकाळात संशोधन करण्याची गरज आहे हेही त्यांनी सांगितले.
भरडधान्य परिषदेची झलक