५ फेब्रुवारी, २०२४ अतिथि व्याख्यानाचा वृत्तांत

12 Feb 2024 17:28:09

shikshana prasaraka mandali Image 1
 
शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या 136 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता स. प. महाविद्यालयाच्या देवी रमाबाई सभागृह येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटी, यू.के. येथील रसायनशास्त्राचे संशोधक प्रा. डॉ. कोलीन सकलिंग आणि अमेरिकेतील थिंक फार्मा कंपनीचे संस्थापक प्रा. डॉ. मुकुंद चोरघडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्री श्रीकृष्ण चितळे, सदस्य श्री राजेंद्र पटवर्धन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुणे परिसरातील ३०० पेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
 
 shikshana prasaraka mandali Image 4
 
कार्यक्रमाची सुरुवात, सौ. सायली यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कै. श्री. कृष्णाजी बल्लाळ डोंगरे, कै. श्री. दामोदर सदाशिव करंबेळकर, कै. श्री.रामचंद्र भिकाजी कुलकर्णी आणि कै. श्री. रामचंद्र गोपाळ देव या शिक्षणकर्मींनी आपल्या उदात्त विचारांनी शिक्षण प्रसारक मंडळी ही संस्था स्थापन केली. त्या संस्थापकांना आदरांजली वाहण्यात आली.

shikshana prasaraka mandali Image 8
 
डॉ. संज्योत आपटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेच्या पुणे, मुंबई, सोलापूर आणि बेंगळुरू येथील सर्व शाखा तसेच संस्थेचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्व आणि योगदान याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सामाजिक वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.
 
shikshana prasaraka mandali Image 8 
 
डॉ. श्रीकांत मुसळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. ॲड. एस. के. जैन यांनी प्रा. कोलीन सकलिंग यांचे, तर श्री. राजेंद्र पटवर्धन यांनी प्रा. मुकुंद चोरघडे यांचे पुष्पगुच्छ, पुणेरी पगडी आणि शेला देऊन स्वागत केले. 
 
त्यानंतर प्रा. कोलीन सकलिंग यांनी ‘Education Across Countries and Continents’ याविषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी जगभरातील शैक्षणिक विश्वातील क्रांतीचा आढावा घेत सध्याच्या शिक्षणाच्या बदलत्या शैलीवर सर्वसमावेशक भाष्य केले. प्रा. कोलीन सकलिंग यांनी त्यांचे भारताबरोबर असलेले संबंध अधोरेखित करताना त्यांच्या वडिलांच्या भारतातील आठवणींना उजाळा दिला. ते सध्या कार्यरत असलेल्या स्ट्रॅथक्लाइड युनिव्हर्सिटीच्या स्थापनेपासून पूर्वेकडील देशांत शिक्षण क्षेत्रात झालेल्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकला. ‘Education’ या शब्दाचा उगम आणि जगभरात त्याचा झालेला प्रसार यावर देखील भाष्य केले. “शिक्षण प्रसारक मंडळी” या नावाप्रमाणेच संस्थेचे कार्य व्यापक आहे, असे सांगून त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
 
shikshana prasaraka mandali Image 3 
 
प्रा. मुकुंद चोरघडे यांनी “Inspired, Inspiring and Inspirational Science” हा विषय उलगडताना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील किस्से आणि अनुभव सांगितले. सध्याच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असा त्यांचा प्रवास यशाची उंच शिखरे पादाक्रांत करायला नक्कीच मदत करेल. प्रा. मुकुंद चोरघडे यांनी “शिक्षण हा सुद्धा आपला जन्मसिद्ध हक्क आहे” हे सांगून शिक्षणचे महत्त्व विशद केले. आपल्या पारंपारिक शिक्षणाबरोबरच पूर्व आणि पश्चिमेकडील शिक्षण पद्धतीतील दरी भरून काढण्यासाठी आपण काम केले पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितले. “विद्या विनयेन शोभते” या उक्तीला अनुसरून आपले वर्तन असावे असेही सांगायला ते विसरले नाहीत. “Make in India” च्या पुढे जाऊन “Invent in India” कडे कशी वाटचाल करता येईल हे सांगून त्यांनी आपले भाषण संपवले.
 
shikshana prasaraka mandali Image 3
shikshana prasaraka mandali Image 3
 
नियामक मंडळाचे सदस्य श्री. राजेंद्र पटवर्धन यांनी चोरघडे कुटुंबाच्या तीन पिढ्यांना नोबेल विजेत्या संशोधकांबरोबर काम करण्याचा अनुभव असल्याचे विशेष नमूद केले.
 
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रशांत दुराफे यांनी आभार मानले आणि अवनी भाटे हिच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
शब्दांकन –

  • डॉ. दिपाली लांडे
  • प्रो. विभावरी पाठक
  • प्रो. प्रसाद वाळिंबे
  • प्रो. मानसी राठोड
  • प्रो. शुभम बडधे
Powered By Sangraha 9.0